जागतिक महिला दिन भाषण
नमस्कार.. तुम्हा सर्वांना जागतिक महिला दिनाच्या खूप शुभेच्छा.८मार्च या दिवशी जगभरात सगळीकडे महिला दिन अतिशय उत्साहात पार पाडला जातो. आपणही त्याच कारणाने आज इथे उपस्थित आहोत. महिलांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन देखील केले जाते. ज्याप्रमाणे आपण अनेक महत्वाचे दिवस साजरे करतो, अगदी त्याचप्रमाणे महिलांसाठीचा हा दिवस साजरा करून त्यांच्या संघर्षमय कार्यासाठी त्यांचे कौतुक करणे आपले कर्तव्य आहे.
खरं तर, फक्त महिला दिनाच्या दिवशीच का? रोज आपल्यासाठी उत्कृष्ट स्वयंपाक बनवणाऱ्या , किचनमध्ये, ऑफिस मध्ये, सतत इतरांसाठी झटणाऱ्या आणि दुर्लक्षित राहिलेल्या स्त्रियांबद्दल कृतज्ञता व्यक्त करायला हवी. स्त्री ही निसर्गाची एक अद्भुत देणगी आहे. कारण एका नवीन जीवनाला या सृष्टीवर आणण्याचं सामर्थ्य फक्त तिच्यातच आहे.त्यामुळे स्त्री ही निसर्गाने निर्माण केलेली एक शक्ती आहे यात काही शंकाच नाही.
जागतिक महिला दिन 2024
International Womens Day 2024 Speech in Marathi
आपण गेल्या काही वर्षात महिलांनी केलेल्या कामगिरीवर लक्ष टाकले, तर सहज लक्षात येईल की पारंपारिकपणे पुरुषांचे वर्चस्व असलेल्या क्षेत्रात देखील स्त्रियांनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे.विज्ञानापासून ते राजकारणापर्यंत, खेळापासून ते व्यवसायापर्यंत स्त्रियांच्या योगदानाची आपल्याला प्रचिती येते.
कोणतीही स्त्री प्रामुख्याने भारतीय स्त्री तिच्या आयुष्याचा जास्तीत जास्त वेळ हा इतरांच्या सुख सोयीसाठी खर्ची करत असते. तिची ऊर्जा, बुद्धी आणि वेळ हा कुटुंबातील व्यक्तींची मर्जी सांभाळण्यात जात असतो. लग्नाआधीही आई-वडील, भावंड आणि लग्नानंतर नवरा, सासू-सासरे, कुटुंबातील इतर सदस्य या सर्वांची मर्जी सांभाळत ती जगत असते. सध्या या परिस्थितीत सुधारणा झालेली असली आणि स्त्री स्वतःच्या पायावर उभे राहून स्वतःचे आयुष्य जगताना दिसत असली तरी हे चित्र फारसं बदललेलं नाही.
स्त्री ही एकाच वेळी अनेक भूमिका पार पाडत असते. ती कधी मुलगी, असते तर कधी ताई, कधी आई, कधी बायको, तर कधी सून.अशा पद्धतीच्या भूमिका पार पाडण्याची तिला एवढी सवय लागून गेलेली असते की, ती जर घरात नसेल तर घरातील सर्वच व्यक्तींची तारांबळ उडते आणि तिच्याही जीवाला घोर लागलेला असतो. परंतु आपण सर्वांनी हे लक्षात घेतले पाहिजे की स्त्री कोणाची तरी आई, पत्नी, बहीण अशा विविध भूमिका पार पाडत असली तरी सर्वात आधी ती एक स्वतंत्र व्यक्ती आहे. तिला सुद्धा वैचारिक भावनिक स्वातंत्र्य असणं अपेक्षित आहे.
केवळ घरातच नाही तर समाजात वावरताना देखील प्रत्येक स्त्रीला सुरक्षित वाटेल स्वतःचा विकास करून घेण्याच्या महत्त्वाकांक्षामध्ये तिला कोणत्याच प्रकारचा अडथळा येऊ नये, याची काळजी प्रत्येक नागरिकांनी घ्यायला हवी. स्त्री पुरुष समानता ही संकल्पना केवळ नावालाच नको तर प्रत्यक्ष समाजाचे जिवंत वास्तव असायला हवी. एक पुरुषाला स्वतःचा विकास करून घेण्याची पूर्ण मुभा आहे, तशीच मुभा आणि सुरक्षिततेची भावना स्त्रीयांच्या मनात निर्माण व्हायला हवी.
International Womens Day 2024 Speech in Marathi
आजच्या या महिला दिना दिवशी निर्धार करूया की, आपण सर्वांनी मिळून अशा समाजाची निर्मिती करू जिथे स्त्री पुरुष समानता केवळ संकल्पना नसून प्रत्यक्ष वास्तविकता असेल, जिथे समाजात वावरताना स्त्रियांच्या मनात कोणत्याही प्रकारची असुरक्षिततेची भावना असणार नाही.
सर्वांना पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.