🖉 जागतिक मातृभाषा दिवस निबंध
मित्रांनो, ...या देशातून सुरूवात झाली मातृभाषा दिन साजरा करण्याची हा लेख तुम्ही वाचला असेलच. त्यातून तुम्हाला कल्पना आली असेल की,मातृभाषा दिनाचा इतिहास काय आहे. तसेच 21 फेब्रुवारीला मातृभाषा दिन का साजरा करतात, याचाही आपण आढावा घेतला. आता आपण जागतिक मातृभाषा दिन या विषयावर आधारित निबंध कसा लिहायचा ते पाहूयात.
मातृभाषा दिनानिमित्त शालेय विद्यार्थ्यांना या विषयावर निबंध लिहायला सांगितला जातो. किंवा तुम्ही एखाद्या निबंध स्पर्धेत भाग घेतला असेल तरीदेखील तुम्हाला हा निबंध वाचून स्वतःहून निबंध लिहिण्याची कल्पना नक्की येईल. चला तर मग वाचूयात मातृभाषा दिन निबंध.
जागतिक मातृभाषा दिवस निबंध
आपण लहानपणापासून घरात आई-वडिलांकडून आजी आजोबांकडून आजूबाजूच्या माणसांकडून जी भाषा ऐकतो आकलन करतो तीच भाषा आपोआप बोलायला लागतो. तीच आपली मातृभाषा होय.’मातृ’ म्हणजेच आई आणि आईप्रमाणे आपली मातृभाषा नेहमी जवळची असते. शाळेत गेल्यावर अभ्यासक्रमात आपल्याला इंग्रजी हिंदी त्याचप्रमाणे अन्य भाषाही शिकाव्या लागतात. कामानिमित्त बाहेर गेल्यावरही आपल्याला अन्य भाषा शिकण्याची वेळ येऊ शकते; परंतु मातृभाषेशी जोडलेली आपली नाळ कधीच तुटू शकत नाही.
मातृभाषेच्या माध्यमातून आपण आपले विचार भावना अगदी सहजरीत्या व्यक्त करतो. आपल्या दैनंदिन व्यवहारात देखील मातृभाषा वापरत असतो. आपली मातृभाषा उत्तमरित्या अवगत असली की तिच्या आधारावर आपण अन्य कोणतीही भाषा सहजरीत्या शिकू शकतो. लहानपणापासून आपली मातृभाषा सतत कानांवर पडत असल्यामुळे ती आपल्याला अवगत तर असतेच परंतु जस जसे आपण शिक्षण घेत जातो तस तशी त्यात परिपक्वता येत जाते.
Write essay on International Mother Language Day
ज्याप्रमाणे मराठी भाषिकांचे स्वतःच्या भाषेवर नितांत प्रेम असते, त्याचप्रमाणे सर्वच भाषिकांचे आपापल्या मातृभाषांवरती प्रेम असते. आणि त्यात काहीच गैर नाही. कारण स्वतःच्या मातृभाषेवर प्रेम म्हणजेच इतर भाषांशी वैर असा त्याचा अर्थ होत नाही. प्रत्येकाने स्वतःच्या मातृभाषेसोबतच इतर भाषांचाही आदर केला पाहिजे. कोणत्याही भाषेला एक वर्षानुवर्षांची समृद्ध परंपरा असते. इतिहास असतो. आणि त्यानंतर ती भाषा विशिष्ट जनसमुदायाची प्रमुख भाषा बनलेली असते, किंबहुना त्या भाषेच्या आधारावरच त्या जनसमुदायाची ओळख निर्माण होते.
महाराष्ट्राची मातृभाषा मराठी आहे.त्याचप्रमाणे कर्नाटकात कन्नड, तामिळनाडूमध्ये तमिळ, केरळमध्ये मल्याळम अशा विविध राज्यांच्या मातृभाषा केवळ भारतातच नाहीत जगभरात बोलल्या जातात. मातृभाषा ही केवळ विशिष्ट प्रदेशाची मातृभाषा नसते, तर त्या प्रदेशाचा भूगोल, इतिहास, स्वभाव, सणवार, रितीभाती हे सर्व गोष्टी त्यात साठविलेल्या असतात. याचाच अर्थ ती मातृभाषा त्या विशिष्ट प्रदेशाच्या संस्कृतीची वाहक असते.
मातृभाषा दिन साजरा करण्याची सुरुवात कशी झाली त्याचाही एक इतिहास आहे. तो असा- जेव्हा भारताची फाळणी झाली तेव्हा पूर्व पाकिस्तान आणि पश्चिम पाकिस्तान असे दोन भाग निर्माण झाले. त्यावेळीच्या पाकिस्तान सरकारने उर्दू भाषेला राष्ट्रभाषा म्हणून मान्यता देणारे धोरण लागू केले. पूर्व पाकिस्तानातील म्हणजेच आत्ताच्या बांग्लादेशातील विद्यार्थ्यांनी या धोरणाविरुद्ध आंदोलन सुरू केले. ढाका विद्यापीठातील आंदोलन करणाऱ्या या विद्यार्थ्यांची मागणी अशी होती की, पूर्व पाकिस्तानात उर्दू भाषा लागू नये, सर्व कारभार बंगालीतच असावा. परंतु पाकिस्तान सरकार उर्दू भाषेचा हट्ट सोडत नव्हते. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाने तीव्र स्वरूप धारण केले. या आंदोलनाला आटोक्यात आणण्यासाठी पाकिस्तान लष्कराने विद्यार्थ्यांवर 21 फेब्रुवारी 1952 रोजी गोळीबार केला. तो दिवस पूर्व पाकिस्तानात भाषाग्रह दिन म्हणून साजरा होऊ लागला. विद्यार्थ्यांच्या आंदोलनापुढे पाकिस्तान सरकारला नमते घ्यावे लागले. आणि बंगाली भाषेला मान्यता द्यावी लागली
बांग्लादेशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर संयुक्त राष्ट्र संघाच्या अधिवेशनात या देशाला सदस्यत्व मिळाले. या अधिवेशनात बांग्लादेशाच्या प्रतिनिधीने मागणी केली की मातृभाषेसाठी दिलेल्या लढ्यातून बांग्लादेशाची निर्मिती झाली आणि या लढ्याचा प्रेरणा दिवस 21 फेब्रुवारी संपूर्ण जगाने मातृभाषा दिन म्हणून साजरा करावा. १९८९ साली संयुक्त राष्ट्र संघाने ही मागणी मान्य केली आणि २१ फेब्रुवारी १९९२ पासून जगातील सर्व देशात जागतिक मातृभाषा दिवस साजरा केला जातो.
जागतिक मातृभाषा दिवस निबंध
कवी कुसुमाग्रज म्हणतात- “भाषा मरता देशही मरतो संस्कृतीचाही दिवा विझे”. म्हणजे एखादी भाषा जेव्हा संपते तेव्हा तिच्याबरोबर सगळी माहिती, अनुभव, शहाणपण, साहित्य, ज्ञान हे सर्व नष्ट होऊन जाते आणि हे केवळ त्या भाषेचे नाही तर तेथील लोकांचे, त्या भाषेच्या साहित्याचे आणि संस्कृतीचेही खूप मोठे नुकसान असते.
म्हणून मातृभाषा मग ती कोणतीही असो मराठी, कन्नड, मल्याळम, इत्यादी ती भाषा सतत वापरात असली पाहिजे. ती भाषा वाढविण्यासाठी संबंधित लोकांनी सकारात्मक प्रयत्न करायला हवेत. प्रत्येकाने स्वतःच्या मातृभाषेप्रमाणे इतरांच्या मातृभाषांचाही आदर केला पाहिजे. कारण सर्वच मातृभाषा आपापल्या परीने सर्वश्रेष्ठ आहेत कोणतीही एखादी भाषा श्रेष्ठ नाही वा कनिष्ठ नाही. प्रत्येकाने असा दृष्टिकोन बाळगल्यास सर्वच भाषांना चांगले दिवस येतील.
Write essay on International Mother Language Day
जागतिक मातृभाषा दिवस निबंध