Law of Attraction आकर्षणाचा सिद्धांत
Law of Attraction हा शब्द तुम्ही ऐकला असेलच. यापूर्वी जर हा शब्द ऐकला नसेल तर या लेखात तुम्हाला या नियमाबद्दल अनेक आश्चर्यकारक गोष्टी वाचायला मिळतील.हा नियम नक्की कसा काम करतो, याच्यामागे काय विज्ञान आहे, हा नियम गरीब, सर्वसामान्य, मध्यमवर्गीय यांनाही लागू होतो की फक्त श्रीमंत आणि उच्चभ्रू लोक याची अनुभूती घेऊ शकतात अशा अनेक मुद्द्यांचा उहापोह या लेखात तुम्हाला वाचायला मिळेल.
Law of Attraction म्हणजे काय ?
आकर्षणाच्या सिद्धांतानुसार तुम्हाला हवी असणारी वस्तू, व्यक्ती वा परिस्थिती ज्याच्याबद्दल तुम्ही सतत विचार करत आहात, कल्पना करत आहात, ती तुमच्या कल्पनेतील वस्तू, व्यक्ती वा परिस्थिती एखाद्या चुंबकाप्रमाणे प्रत्यक्ष तुमच्या जीवनात येते.
आकर्षणाचा सिद्धांत समजून घेताना पुढील गोष्टी माहीत असायलाच हव्यात.
- ‘The Secret’ ( रहस्य)
आकर्षणाचा सिद्धांत माहित आहे परंतु 'द सिक्रेट' या पुस्तकाबद्दल माहित नाही अशी व्यक्ती सापडणं कठीण. 'द सीक्रेट' या पुस्तकाच्या लेखिका रॉन्डा बर्न यांनी या पुस्तकाच्या माध्यमातून आकर्षणाचा नियम विविध उदाहरणांच्या आणि प्रसंगाच्या माध्यमातून तसेच अनेक दिग्गजांच्या अनुभवांद्वारे समजावून सांगितला आहे. आकर्षणाचा नियम नव्याने जाणून घेण्यार्यांठी हे पुस्तक म्हणजे पर्वणीच आहे.
या पुस्तकात आकर्षणाचा सिद्धांत कसा काम करतो, त्या नियमाचा आपण जाणीवपूर्वक कसा वापर करून घेऊ शकतो आणि हा नियम वापरण्याच्या पायऱ्या काय आहेत हे वाचायला तर मिळतच परंतु हा नियम वापरून जे लोक प्रत्यक्ष जीवनात यशाच्या शिखरावर पोहोचले आहेत त्यांचेही अनुभव या पुस्तकातून आपल्याला वाचायला मिळतात.
- आकर्षणाचा सिद्धांत कसा काम करतो
'द सीक्रेट' या पुस्तकात अनेक लेखकांची या सिद्धांताबाबतची विविध मते वाचायला मिळतात. त्यातील जॉन असाराफ यांनी या सिद्धांताबद्दल केलेले वर्णन हा सिद्धांत समजून घेण्यासाठी समर्पक आणि सोपे वाटते.
- जॉन असाराफ
जॉन असाराफ असे म्हणतात की, माणूस म्हणून आपलं काम हे की जे विचार आपल्याला हवेत तेच मनात धरून ठेवणे. तुम्हाला नेमकं काय हवंय हे मनात अगदी स्पष्टपणे ठरवा. असं करून तुम्ही विश्वातील महान नियमापैकी एक नियम स्वतःसाठी क्रियाशील करत असता. तुम्ही ज्याविषयी सर्वाधिक विचार करता तीच परिस्थिती तुम्ही स्वतःकडे आकर्षित करता. तुम्ही ज्या वस्तूबद्दल किंवा व्यक्तीबद्दल सर्वात अधिक विचार करता ती आपल्याकडे खेचून घेता किंवा आकर्षित करता.
तुमचं वर्तमान जीवन, सध्याचं जीवन हे तुमच्या भूतकाळातील विचारांचे प्रतिबिंब आहे. यात तुमच्यापाशी असलेल्या सर्व चांगल्या गोष्टी सामील आहेत. त्याचप्रमाणे वाईटही. तुमचे जीवनातील प्रत्येक क्षेत्राबाबत काय विचार आहेत हे तुम्हाला अगदी सहजच कळेल कारण तेच तर तुम्ही अनुभवत आहात. तुमच्या त्या विचारांना आलेलं हे अस्तित्व आहे.
पुढे जाऊन जॉन असाराफ असेही म्हणतात की, बहुतेक लोकांना हे माहीत नसतं की प्रत्येक विचाराला देखील एक फ्रिक्वेन्सी असते आपण विचार मोजू शकतो. आणि म्हणूनच जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीविषयी सातत्याने पुन्हा पुन्हा विचार मनात आणत असता उदाहरणार्थ, नवी कोरी गाडी, जरूर असलेली रक्कम/ पैसा, तुम्हाला हवा तसा जीवनसाथी मिळणं याची कल्पनाचित्र मनात उभी करता त्यावेळी तुम्ही त्या विचाराची विशिष्ट फ्रिक्वेन्सी सतत प्रक्षेपित करीत असतात.
बहुतेक लोक तर त्यांना जे नको आहे त्याचा विचार सातत्याने करत राहतात आणि मग त्यांना उगीचच आश्चर्य वाटते की, आपल्याच बाबतीत वाईट गोष्टी पुन्हा पुन्हा का घडतात.लोकांना हव्या त्या गोष्टी न मिळण्याचे एकमेव कारण म्हणजे ते त्यांना जे हवं आहे त्याचा विचार करण्याऐवजी त्यांना जे नको आहे याचाच विचार अधिक करतात.
- बॉब प्रॉक्टर
बॉब प्रॉक्टर यांच्या मतानुसार, आकर्षणाचा नियम हा नेहमीच कार्यरत असतो. मग भले तुमचा या नियमावर विश्वास असो वा नसो. हा नियम तुम्हाला माहीत असो वा नसो. जेव्हा तुम्हाला या नियमाची जाणीव होते तेव्हा मात्र तुम्हाला कळू लागतं की, किती अविश्वसनीय रित्या तुम्ही शक्तिशाली आहात. केवळ विचारांच्या माध्यमातून तुम्हाला जे जे हवं आहे ते ते सर्व तुम्ही तुमच्या जीवनात सहज अस्तित्वात आणू शकता.
- लीसा निकोल्स
लीसा निकोल्स यांचे आकर्षणाच्या सिद्धांता बाबतचे मत आपल्याला द सीक्रेट या पुस्तकात वाचायला मिळते. त्या म्हणतात, दाेन प्रकारच्या भावना असतात. चांगल्या भावना आणि वाईट भावना. चांगल्या भावनांमुळे आपल्याला छान वाटतं आणि वाईट भावनांचा त्रास होतो. जेव्हा तुम्हाला वाईट वाटत असतं तेव्हा तुम्ही आणखी वाईट गोष्टी स्वतःकडे आकर्षित करता. आणि जेव्हा तुमच्या मनात शुभ विचार चालू असतात तेव्हा चांगल्या गोष्टी स्वतःकडे आकर्षित करता. म्हणजेच तुमच्या मनात जे विचार चालू आहे तशा गोष्टी स्वतःकडे आकर्षित करण्याच्या फ्रिक्वेन्सी वर तुम्ही असता. म्हणजेच तुम्ही दुःखी आहात आणि मनातील विचार बदलण्याचा किंवा आनंदी होण्याचा प्रयत्न तुम्ही केलाच नाही तर अर्थातच तुम्ही आणखी वाईट गोष्टींना तुमच्या जीवनात आमंत्रण देत आहात.
याची दुसरी बाजू अशी की, ज्याप्रमाणे आपल्या मनात वाईट विचार येतात त्याचप्रमाणे चांगल्या भावना देखील येतात. उदाहरणार्थ आनंद, उत्साह, कृतज्ञता, प्रेम या सकारात्मक भावना देखील आपण अनुभवत असतो. जेव्हा तुमच्या मनात या चांगल्या भावनांचा उत्सव साजरा होतो, तेव्हा आणखी चांगल्या भावना आणि चांगल्या गोष्टी तुम्ही स्वतःकडे आकर्षित करत असता.
आकर्षणाचा सिद्धांत वापरून जीवनात यशस्वी झालेल्या वरील तीनही व्यक्तींची मते आपण वाचली. यातून तुम्हाला या सिद्धांताबद्दल थोडक्यात माहिती मिळाली. आता मात्र महत्त्वाचा प्रश्न येतो की, हा सिद्धांत नेमका वापरायचा कसा किंवा ताे वापरण्यासाठी नियम किंवा अटी काय आहेत. या पुस्तकात सांगितल्याप्रमाणे आकर्षणाचा सिद्धांत वापरण्याच्या तीन पायऱ्या आहेत त्या समजून घेऊ.
पहिली पायरी आहे मागणी करा म्हणजे मिळेल. तुम्हाला खरोखर काय हवं आहे याची स्पष्ट प्रतिमा तुमच्या मनात तयार करा. कारण तुम्हाला नेमकं काय हवं आहे हे अत्यंत स्पष्टपणे ठरवायला हवं. जर तुम्ही स्पष्ट नसाल तर आकर्षणाचा नियम तुमची मनपसंद गाेष्ट देऊ शकत नाही. कारण अशावेळी तुम्ही मिश्रित फ्रिक्वेन्सी प्रक्षेपित करत असता आणि मग तुम्हाला मिश्रित परिणाम मिळतात. तुम्हाला हवे असणारे अपेक्षित परिणामांपासून तुम्ही दूर जाता. तुम्हाला पुन्हा पुन्हा मागत राहण्याची गरज नाही फक्त एकदाच मागा. तुम्हाला नेमकं काय हवं आहे हे जर तुम्ही मनात स्पष्ट केलेत तर त्याचाच अर्थ तुम्ही ते मागितलं. त्यामुळे पहिली पायरी आहे फक्त मागा.
लीसा निकाेल्स म्हणतात की, सर्वात महत्त्वाची पायरी म्हणजे विश्वास ठेवणे. असा विश्वास बाळगा की ती गोष्ट तुम्हाला मिळालेलीच आहे. तुमचा विश्वास कमी होईल अशी कोणतीही गोष्ट पाहू नका, ऐकू नका, किंवा वाचू नका. तुमच्या वागण्यातून, बोलण्यातून असं जाणवत राहिलं पाहिजे की तुम्हाला जे काही मिळवायचं आहे ते आधीच मिळालेलं आहे. असं समजून वागा. निदान तसा अभिनय तरी करा. करायलाच हवा. काळजी, चिंता, त्रास करून घेऊ नका. त्या वस्तू तुमच्याकडे सध्या नाहीत हा विचार सुद्धा मनात आणू नका. मला हवे असणाऱ्या गोष्टी तुमच्याकडे आहेत असेच विचार मनात आणा.
जर तुमच्या मनामध्ये ती गोष्ट अद्याप मिळालेली नाही हेच असेल तर तुम्ही तेच आकर्षित कराल. म्हणूनच ती गोष्ट तुम्हाला मिळालेलीच आहे असा तुमचा दृढ विश्वास असणे अत्यावश्यक आहे. ती गोष्ट तुमच्यापाशी आलेली आहे ही भावनांची फ्रिक्वेन्सी तुम्ही प्रक्षेपित केली पाहिजे. तरच ती चित्रं तुमच्या जीवनात साकार होतील. अस्तित्वात येतील. जेव्हा तुम्ही असं करता तेव्हा आकर्षणाचा नियम सर्व शक्तींनीशी ती घटना, परिस्थिती, व्यक्ती यांच्यात असे काही बदल घडवून आणतो की, तुम्हाला ती गोष्ट मिळते. श्रद्धा, निष्ठा, विश्वास हीच तुमची प्रचंड शक्ती होय.
तिसरी आणि शेवटची पायरी म्हणजे प्राप्ती. तुम्हाला हवी असलेली ती विशिष्ट गोष्ट मिळाल्यानंतर तुम्हाला किती आनंद होईल तो आनंद आत्ताच अनुभवायला सुरुवात करा. या सर्व प्रक्रियेत तुमचं आनंदी असणं, हवी असणारी वस्तू मिळाल्याच्या सुखद आनंदात रममान असणं, अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण जेव्हा तुम्ही आनंदात असता तेव्हा तुम्ही स्वतःला त्या फ्रिक्वेन्सीवर नेवून ठेवता आणि तुम्हाला हवी असणारी गोष्ट ही त्याच फ्रिक्वेन्सीवर असते.
तुम्हाला हवी असलेली गोष्ट साकार करण्याचं सामर्थ्य तुमच्या मागणीत असेलंच असं नाही, त्यासाठी तुम्ही त्या भावनेत असणं गरजेचं आहे. तुम्हाला हव्या असलेल्या गोष्टींची यादी करा. आणि त्या गोष्टी तुम्हाला मिळालेल्या आहेत हे मानसिक स्तरावर अनुभवा. जेव्हा तुम्ही खुशीत, सुखद मनस्थितीत असता, तेव्हा तशाच प्रकारच्या गोष्टी तुम्ही स्वतःकडे आकर्षित करत असता. म्हणून तुम्हाला हवी असलेली गोष्ट लवकरात लवकर मिळण्यासाठी तुम्हाला स्वतःला त्या फ्रिक्वेन्सीवर नेऊन ठेवणं अत्यंत महत्त्वाचं आहे.
निष्कर्ष
मित्रांनो... या लेखात आपण law of attraction म्हणजेच आकर्षणाचा सिद्धांत म्हणजे काय तो कसा काम करतो तो कसा वापरायचा याविषयी सविस्तर जाणून घेतले. त्याचप्रमाणे हा सिद्धांत वापरून यशस्वी झालेल्या व्यक्तींचे विचारदेखील आपण वाचले आशा आहे, की हा लेख तुम्हाला आवडला असेल.