5 things about Dr. B. R. Ambedkar डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी या गोष्टी तुम्हाला माहित आहेत का ?


        आपण सर्वजण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना भारतीय घटनेचे शिल्पकार, कायदेपंडित, अस्पृश्याचे जनक, दलितांचे उद्धारकर्ते, थोर अर्थशास्त्रज्ञ अशा अनेक प्रकारे ओळखतो. त्यांनी केलेले सामाजिक कार्य, भारतीय घटनेला दिलेले योगदान आपण सर्व नेहमी ऐकतच असतो वा वेगवेगळ्या माध्यमातून वाचत असतो. परंतु, याही पलीकडे अशा थोर महामानवांच्या दैनंदिन सवयी,  ते कसे वागत, कसे राहत, कसे बोलत, त्यांना कोणकोणत्या सवयी होत्या, त्यांच्या आवडीनिवडी काय हाेत्या, अशा अनेक गोष्टींची आपल्याला उत्सुकता असते. तुम्हाला सुद्धा बाबासाहेबांविषयीच्या अशा आश्चर्यकारक आणि मजेशीर गोष्टी जाणून घ्यायच्या असल्यास हा लेख नक्की वाचा.




 

बाबासाहेबांना किती भाषा अवगत होत्या

        आपल्याला वाचून आश्चर्य वाटेल पण, हो. हे खरं आहे की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना मराठी सोबतच हिंदी, इंग्रजी, गुजराती, फ्रेंच, जर्मन अशा सहा भाषा अवगत होत्या. पाली आणि संस्कृत भाषेतही त्यांनी संशोधन केलेले असल्यामुळे या भाषांचादेखील त्यांचा गाढा अभ्यास होता. बाबासाहेबांना भाषांची फार आवड हाेती. इंग्रजी तर ते उत्तम जाणतच होते. इंग्रजीप्रमाणे मराठी भाषेचाही त्यांना फार अभिमान होता. बहिष्कृत भारत, जनता, मूकनायक यासारख्या साप्ताहिकांचे कित्येक वर्ष ते संपादक होते. जनता पत्रात येणारे मुख्य संपादकीय लेख सर्व त्यांच्याच लेखणीतून उतरलेले होते. जर्मन भाषेचाही  त्यांनी चांगला अभ्यास केलेला होता. गुजराती भाषेत त्यांनी अहमदाबाद येथे व्याख्यान दिले होते.




 मराठी संत कवींची कवने, अभंग बाबासाहेबांना लहानपणापासूनच तोंडपाठ होते


        मुलांमध्ये विद्येची अभिरुची निर्माण व्हावी म्हणून बाबासाहेबांचे वडील सकाळी भजने, अभंग, दोहे म्हणायला लावत. तसेच संध्याकाळी पुन्हा सर्व भावंडांना एकत्र बसवून शिस्तबद्ध रीतीने आणि भक्तीभावाने संतांचे अभंग व कबीराचे दोहे वडील रामजी त्यांना म्हणून दाखवत. अशाप्रकारे बाबासाहेबांच्या मनात वडिलांनी भक्तिमार्गाचे वातावरण निर्माण केले. वडिलांच्या प्रभावामुळे बाबासाहेबांना देखील मुक्तेश्वर, तुकाराम  वगैरे संत कवींची कवने तोंडपाठ झाली.


        बाबासाहेब म्हणतात, “पुष्कळजणांना वाटते मला धर्माविषयी तिरस्कार आहे. पण ही गोष्ट खरी नाही. हा लोकांचा माझ्याबद्दलचा गैरसमज आहे.  जे जे लोक माझ्या सानिध्यात येतात त्यांना माझी धर्माविषयीची श्रद्धा व प्रेम माहित आहे. धार्मिक ढाेंग मला बिलकुल पसंत नाही. ज्या धर्माच्या शिकवणुकीमुळे मनुष्याच्या अंतकरणातील पाशवी वृत्ती काबुत आणल्या जात नाहीत तो धर्म कुचकामाचा आहे, असे अजून माझे मत आहे. माझी मते अशी प्रागतीक बनली याचे श्रेय माझ्या वडिलांच्या धार्मिक वृत्तीलाच मी देतो. पण भक्तीमार्गाने मनुष्य हा विभूतीपूजक, मूर्तीपूजक बनतो हा त्यातला मोठा दोष आहे. म्हणून भक्तीमार्ग हा राष्ट्राला विघातक आहे. असे माझे प्रामाणिक मत आहे. कदाचित माझे हे म्हणणे लोकांना पटणार नाही. पण त्यांनी माझ्या या म्हणण्याचा खोल व ऐतिहासिक भूमिकेवरून व नि:पक्षपाती बुद्धीने विचार करावा, म्हणजे बुद्धिवादी माणसाला माझ्या म्हणण्याचे प्रत्यंतर आल्यावाचून राहणार नाही." 




डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि संत गाडगेबाबा यांच्यातील अतूट नाते


        भारतीय संत परंपरेत संत गाडगेबाबा हे सर्वांपेक्षा आगळेवेगळे संत आहेत. त्यांची किर्तनशैली सर्वांपेक्षा वेगळी होती. आणि त्यांच्या प्रबोधनात्मक शैलीमुळेच गाडगेबाबा आणि बाबासाहेब आंबेडकर एकत्र आले. मुंबईत जेव्हा जेव्हा गाडगेबाबांचे  किर्तन असे तेव्हा बाबासाहेब आवर्जून  किर्तनाला उपस्थित राहत. आणि चक्क खाली जमिनीवर बसून सर्वसामान्यांसारखे ते किर्तन ऐकत. संत गाडगेबाबा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाते जरी गुरु शिष्याचे असले तरी त्यांनी कधीच त्याचा देखावा केला नाही. गाडगेबाबांची  किर्तने नेहमीच जिव्हाळा, आपुलकी, काळजी, प्रेम, आदर, कळवळा सामंजस्याने भरलेली असत. आणि म्हणून बाबासाहेब गाडगेबाबांच्या  किर्तनाला नेहमी हजेरी लावत. बाबासाहेबांच्या विद्वत्तेने आणि प्रभावी व्यक्तिमत्वाने गाडगेबाबा नेहमीच भारावून जात. त्यांच्या कार्याचा फार मोठा प्रभाव गाडगेबाबांवर होता. आणि म्हणूनच ते आपल्या  किर्तनात बाबासाहेबांच्या नावाचा जयजयकार करायला सांगत. त्यांचे विचार कार्य  किर्तनाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवीत.






        बाबासाहेब आंबेडकर संत गाडगेबाबांकडे सल्ला मागायला गेले तर गाडगेबाबा त्या निर्णयाला सूचना  वा सल्ला न देता पाठिंबा देत. या सल्ला घेण्याच्या आणि देण्याच्या प्रक्रियेत औपचारिकता नसे बाबासाहेब कायदेमंत्री असताना सुद्धा गाडगेबाबांची माहिती घेत. त्यांची विचारपूस करीत. आजारी असल्यास बाबासाहेब स्वतः त्यांच्या घरी जात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर कायदामंत्री असतानाची गोष्ट. सायंकाळी त्यांना तातडीने दिल्लीला पोहोचायचे होते. परंतु, त्याचवेळी त्यांना समजले की, गाडगेबाबा जवळच्या दवाखान्यात उपचार घेत आहेत. हा निरोप ऐकतात बाबासाहेबांनी त्या दिवसाचे सर्व कार्यक्रम रद्द केले आणि गाडगेबाबांच्या भेटीसाठी निघाले. ते गाडगेबाबांना म्हणाले, "आपण कोणाकडूनही काहीच स्वीकारत नाही, तरी मी या दोन घोंगड्या आपल्यासाठी आणल्या आहेत. एक अंथरण्यासाठी आणि एक पांघरण्यासाठी याचा स्वीकार करावा." या प्रसंगावरून त्या दोघांमधील जिव्हाळ्याचे नाते आपल्याला समजून येते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे दिल्लीत महापरिनिर्वाण झाले आणि हे जेव्हा गाडगेबाबांना समजले तेव्हा ते धाय मोकलून रडले. 'असे गेले कोट्यान कोटी काय रडू एकल्यासाठी' असे म्हणणारे गाडगेबाबा का रडत आहेत, हे कोणालाच कळेना. तेव्हा ते आपल्या सहकाऱ्यांना म्हणतात, "अरे तुमचा आमचा बाप आज या जगात राहिला नाही. तुम्ही आम्ही पोरके झालो". कधीही न रडणारे गाडगेबाबा पहिल्यांदाच एवढे दुःखी  झाले यातूनच आपल्याला त्यांच्यातील अतूट नात्याचे दर्शन घडते. 




बाबासाहेबांना उत्तम दर्जाचे पेन, पेन्सिल्स खरेदी करण्याची आणि वापरण्याची अत्यंत आवड होती


        जेव्हा जेव्हा बाबासाहेब त्यांची मोटार घेऊन बाहेर फिरायला जात,  तेव्हा आवर्जून एखाद्या स्टेशनरीच्या दुकानापुढे थांबत असत. मग दुकानदार निरनिराळ्या  वीस-पंचवीस पेन्सिल त्यांच्यासमोर आणून ठेवत असे. त्यापैकी सात-आठ पेन्सिल बाबासाहेब विकत घेत असत.  त्याचप्रमाणे त्यांचा सहाय्यक जॉन नेहमीच मुंबईतल्या बाजारात फिरून तेथे उपलब्ध असणारी विविध आकर्षक पेनं बाबासाहेबांसाठी विकत आणत असे. मग प्रत्येक पेनने छोट्या कागदावर आपली स्वाक्षरी करून ते पाहत आणि त्यांना आवडलेली चार-पाच पेने ते आपल्या कोटाच्या खिशाला लावत. तसेच लिखाणासाठीही वेगवेगळ्या प्रकारच्या पेन्सिल्स जमवण्याची त्यांना हौस होती. त्यांच्या टेबलावर नेहमीच निरनिराळ्या प्रकारचे पेन, वेगवेगळ्या आकाराच्या पेन्सिल्स पाहायला मिळत.  त्यापैकी एखादी जरी पेन्सिल त्यांच्या टेबलावरून कोणी नेली किंवा हरवली तर ते संतापत व जोपर्यंत ते पेन किंवा पेन्सिल मिळत नाही तोपर्यंत घरातील इतर लोकांची धडगत नसे.




बाबासाहेबांचे पशुप्रेम


        डॉ. बाबासाहेबासाहेबांनी मुंबईत चाळीत राहत असताना हरिण पाळले होते. तसेच  मुंबईतील राजगृह या निवासस्थानी त्यांनी टाॅबी नावाचा कुत्रा पाळला होता. सायंकाळी घरी येताना ते टॉबीसाठी जिलेबी आणत असत. घटना समितीच्या मसुदा समितीचे अध्यक्ष असताना त्यांनी काॅकर साॅनीयल या जातीचादेखील एक कुत्रा पाळला होता. त्याचे नाव होते पिटर. आणि पिटरची सोबती होती मोनिका नावाची कुत्री. बाबासाहेबांचा या दोघांवरती फारच जीव होता. ते मोनिकाला हाताने जेवण भरवीत असत. जेव्हा त्यांच्या लाडक्या टॉबीचे निधन झाले, तेव्हा बाबासाहेब  धाय माेकलून रडले होते.  बाबासाहेबांनी त्यांच्या कुत्र्यांना एवढा लळा लावला होता की, त्यांच्या महापरिनिर्वाणानंतर एक महिन्याच्या आतच  एकनिष्ठ पीटरचेदेखील निधन झाले.



निष्कर्ष


या लेखात आपण  बाबासाहेब आंबेडकरांचे भाषाप्रेम, संत गाडगेबाबा यांच्यासोबत असणारे त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध, लहानपणापासूनच संतांचा आणि त्यांच्या अभंगांचा असणारा त्यांचा अभ्यास, विविध प्रकारचे पेन आणि  पेन्सिलची त्यांना असणारी आवड आणि त्यांचे प्राण्यांवरचे प्रेम या गोष्टी जाणून घेतल्या आशा आहे की, हा लेख तुम्हाला आवडला असेल. 




Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.