मालवणी म्हणी (Malvani Mhani/ Idioms) या मजेशीर मालवणी म्हणी तुम्ही क्वचितच ऐकल्या असतील...


😂😉😆😐😏😝😜😧😲😮


        मित्रांनो... जगभरात अनेक प्रमुख भाषा बोलल्या जातात. त्यातही प्रत्येक प्रदेशात काही विशिष्ट बोलीभाषा देखील बोलल्या जातात आणि या बोलीभाषांची गंमत काही औरच असते. त्या बोलीभाषांचा लहेजा, त्यातील विशिष्ट शब्द आणि त्या भाषेत प्रामुख्याने वापरल्या जाणाऱ्या म्हणी, वाक्प्रचार या सर्व गोष्टी अगदी वैशिष्ट्यपूर्ण असतात. जगभरात सुमारे सात हजार भाषा बोलल्या जातात. भारतात प्रामुख्याने 22 भाषा वापरल्या जातात. आणि त्यातही सोळाशेच्या आसपास मातृभाषा आहेत.

        दक्षिण कोकणात किंवा तळ कोकणात म्हणजेच सिंधुदुर्गात प्रामुख्याने मालवणी भाषा बोलली जाते. जी कोकणी भाषेची उपभाषा आहे. चित्तपावनी, वारली,  काणकोणी आणि डांगी यादेखील कोकणी भाषेच्या उपभाषा आहेत.मालवणी भाषा ऐकायला जेवढी गोड वाटते तेवढ्याच त्यातील म्हणी सुद्धा किती  मजेशीर आणि अर्थपूर्ण आहेत याचा प्रत्यय तुम्हाला या म्हणी वाचून येईलच.































































 १)    जग फिरान इलो आणि हुमऱ्याक आपटान मेलो -

🤦

जगभ्रमंती करून आलेला माणूस घरात येताना उंबरठ्याला आपटून मरण पावला तर त्यावेळी त्याची होणारी अवस्था म्हणजेच मोठी कामगिरी पार पाडणे परंतु क्षुल्लक कारणाने त्यावर पाणी पडणे.



२)    जेचा घरणीवांगडा वाकडा, तो खाय चुलीतली लाकडा -

😆 

ज्याचे घरातील गृहिणीसोबत भांडण होते त्याला जेवण सुद्धा मिळणार नाही त्याला चुलीतील लाकडेच खावी लागणार.थोडक्यात जळात राहून माशाशी वैर करू नये. 



३)    बेबला बायत पडला नि माथा झळझळीत झाला -

🤔

 एखादी अर्धवट व्यक्ती चुकून विहिरीत पडली तर इतर लोक तिला बाहेर काढून तिचा जीव वाचवतात. ही दुर्घटना जरी घडली तरी त्यातही एक चांगली गोष्ट म्हणजे त्या व्यक्तीची स्वच्छ अंघोळ झाल्याने तिचे अंग स्वच्छ झाले. म्हणजेच वाईटात काहीतरी चांगले घडले.



४)    देना नाय घेना नि कंदिलान येना -

🤷

आपला संबंध नसला तरी विनाकारण लुडबुड करणे. 



५)    कोको खाता रव, हिवाळा गावला मव -

🙆

शेतीसाठी पेरलेले धान्य (रव) रानकोंबडी (कोको) खाऊन जाते, परंतु शेतकऱ्याला मात्र एक साप दिसतो आणि तो त्यालाच मारतो. 

थोडक्यात, चोर सोडून संन्याशाला फाशी. 



६)    ताकाक जाऊन, बुडकुलो कित्या लपया -

😐

ताकासाठी जाणे पण भांडे लपविणे, हवी असलेली वस्तू स्पष्टपणे न मागता आढेवेढे का घ्यावे ? 



७)    कापाड नेला बायन आणि चिंधी नेली गायन -

🤦

चांगले कापड एखाद्या बाईने नेणे आणि बाहेर वाळत घातलेली चिंधी किंवा जुणेरे गाईने खाल्ले, अशा वेळी होणारी अवस्था. थोडक्यात, तेल गेले तूप गेले हाती राहिले धुपाटणे. 



८)    दिस सरलो रेटारेटी नि सांजे दियाक कापूस घोटी - 

🙃

दिवस फुकट घालवायचा आणि संध्याकाळी अंधारात कापसाच्या वाती करायला घ्यायच्या. थोडक्यात, तहान लागली की विहीर खणायला घेणे. 



९)    मेल्या म्हशीक पाच शेर दूध - 

🧐

नसलेल्या गोष्टीबद्दल खूप स्तुती करणे कारण पुरावा म्हणून ती गोष्ट समोर नसते.

 


१०)    माझो बाबा काय करी, आसलेला नाय करी -

🤸

जे चांगले आहे ते नष्ट करण्याचे काम करणाऱ्यासाठी ही म्हण वापरतात. 



११)    वाघ पडलो घळीत नि केलडा दाखयता नळी - 

🐒

वाघ दरीत पडला तर माकडसुध्दा त्याला घाबरवतात किंवा चेष्टा करतात. म्हणजेच, अडचणीत असलेल्या शूर माणसाला क्षुद्र व्यक्तीसुद्धा घाबरवते. 



१२)    आंधळ्याचा हात चुकून बुडकुल्यात - 

🧑‍🦯

आंधळ्या व्यक्तीला एखादी वस्तू सहज सापडत नाही पण एखाद्या वेळेस मडक्यातील हवी तीच वस्तू पटकन सापडणे. 



१३)    बारा हात तवसा, तेरा हात बी - 

🥒

तवसा म्हणजे काकडी. बारा हात लांब काकडी पण तिची बी तेरा हात लांब.

म्हणजेच अतिशयोक्ती करणे. 



१४)    मीठ लाया नि माका खाया- 

😝

मीठ लावा आणि मला खा. म्हणजे आपल्याला कळो न कळो सगळया गोष्टीत पुढे पुढे करणे. 



१५)    भोपळीन बाय पसारली, पाटले गुण इसारली -

😕

भोपळ्याचा वेल सुरुवातीला आधार घेऊन वाढतो. पण पुढे स्वतंत्रपणे एवढा वाढतो की, आधी आपल्याला कोणी आधार दिला हेच विसरतो. कृतघ्न माणसासाठी ही म्हण वापरतात.

 


१६)    जाना कुणाची पाची नि सकला आपली घोटी नाची - 

😆

आपला थेट संबंध नसतानादेखील विनाकारण  दुसऱ्याच्या कामात पुढे पुढे करणे.



१७)    एक मेलो घाडी म्हणून वसाड पडत नाय वाडी -

🙃

एक व्यक्ती मरण पावली म्हणून संपूर्ण वाडी ओस पडत नाही. 



१८)    मोठी मोठी बाता नि व्हायन चाटून खाता - 

🤦

प्रत्यक्ष काहीच मिळकत नसताना मोठ मोठ्या बढाया 

मारणे. 



१९)     मोर नाचता म्हणून तुडतुडा नाचता - 

🦚

मोर नाचतो म्हणून लांडोर (तुडतुडा) देखील नाचते.

दुसऱ्याचे अनुकरण करणे.



२०)    आयजीच्या जीवार बायजी उधार सासयेच्या जीवार जावई सुभेदार - 

😎

स्वतः काहीच न करता दुसऱ्यावर अवलंबून राहणे. 



२१)    जेचे भरडावर काजी तेचे सगळे पूर्वज राजी - 

🌳

ज्या व्यक्तीची सर्व कामं सहज साध्य होतात त्याला त्याच्या पूर्वजांचा आशीर्वाद असतो, या अर्थाने ही म्हण वापरली जाते.



२२)    सरड्याची धाव वय पर्यंत -

सरड्याची धाव कुंपणापर्यंत. वय म्हणजे कुंपण.



२३)    हात पाय रवले नि काय करू बायले -

🤷

प्रकृती अस्वास्थ्यामुळे जेव्हा काम करायला जमत नाही किंवा 

पूर्वी कष्टाळू असणाऱ्या व्यक्तीला जेव्हा वृद्धापकाळामुळे काम करणे झेपत नाही तेव्हा ही म्हण वापरतात. 



२४)    दिवसाडी मिरावता नि रातच्याक परावता -

🤸

दिवसभर फिर फिर फिरायचे रात्री मात्र अंग /हात/पाय दुखत असल्याची तक्रार करायची.



२५)    हळकुंडाच्या पदरात शेळकुंड -

🤦

चांगल्याच्या पदरात वाईट पडणे.




निष्कर्ष


मालवणी  बोलीभाषेतील या म्हणी तुम्हाला नक्कीच  आवडल्या असतील. मौखिक परंपरेने चालत आलेल्या या म्हणींच्या शब्दरचनेत काही वेगळेपण जाणवू शकते किंवा काही ठिकाणी अपभ्रंश देखील झालेला दिसून येतो. परंतु, या म्हणींचा अर्थ आणि आशय मात्र सगळीकडे सारखाच दिसून येतो. तुम्हाला देखील  अशा काही मालवणी म्हणी माहित असतील तर कमेंट सेक्शन मध्ये नक्की लिहून कळवा. 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.