ऋतू समजून घेताना...
सामान्यत: आपल्याला उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा या तीन मुख्य ऋतूंबद्दल माहिती असते. या ऋतुंविषयी काही बोलताना किंवा वर्णन करताना उन्हाळा, पावसाळा, हिवाळा यांचीच नावे प्रामुख्याने घेतली जातात. परंतु, सहा उपऋतू (वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत, शिशिर.) यांच्याविषयी फारसं आपण बोलत नाही. बऱ्याच जणांना ही नावेदेखील माहीत नसतात. या लघुलेखात आपण जाणून घेणार आहोत की, हिंदू दिनदर्शिकेनुसार हे सहा ऋतू मराठी आणि इंग्रजी महिन्यांमध्ये कसे विभागले आहेत.
🌿 वसंत ऋतू 🌿
इंग्रजी महिन्यानुसार मार्च-एप्रिलच्या दरम्यान तर मराठी महिन्यानुसार चैत्र आणि वैशाख या महिन्यांमध्ये येणारा ऋतू म्हणजेच वसंत. वसंत सुरू होताच थंडीचा जोर कमी होतो आणि सूर्याची उबदार किरणे येऊ लागतात. एकीकडे कडाक्याची थंडी आणि त्याचवेळी होणारे वसंत ऋतूचे आगमन आणि सूर्यकिरणाची मिळणारी ऊब यामुळे सर्वांनाच हा ऋतू हवाहवासा वाटतो. विविध रंगाची फुले याच ऋतूत बहरतात. चाफा, गुलमोहर, मोगरा अशा अनेक विविधरंगी फुलांनी निसर्ग नटलेला दिसतो. एकीकडे थंडीचा जोर कमी होत असतो तर दुसरीकडे उन्हाळ्याची सुरुवात होत असते. त्यामुळे या दिवसात कडाक्याची थंडीदेखील वाजत नाही आणि फारसा उष्माही जाणवत नाही. असा हा वसंत ऋतू आपल्या सर्वांनाच आवडतो.
🌿 ग्रीष्म ऋतु 🌿
मराठी महिन्यांनुसार ज्येष्ठ आणि आषाढ तर इंग्रजी महिन्यांनुसार मे, जूनमध्ये ग्रीष्म ऋतू येतो. मे महिन्यात उन्हाचा कहर असतो, तर जूनमध्ये मान्सूनची सुरुवात होते. त्यामुळे ग्रीष्म ऋतूत उन्हाच्या झळा जरी सहन कराव्या लागल्या तरी त्यानंतर लगेचच पावसाचे होणारे आगमन सुखावणारे असते.
🌿 वर्षा ऋतू 🌿
नावावरूनच हा ऋतू चटकन आपल्या लक्षात येतो. वर्षा म्हणजेच पाऊस. इंग्रजी महिन्यांनुसार जुलै, ऑगस्ट तर मराठी महिन्यांनुसार श्रावण, भाद्रपद. श्रावण महिना म्हटला की आपल्याला आठवते ती बालकवींची कविता “श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहिकडे क्षणात येती सरसर शिरवे क्षणात फिरुनी ऊन पडे”. बालकवींच्या या ओळी श्रावण महिन्याचे किती अचूक वर्णन करतात ! वर्षा ऋतूत ज्याप्रमाणे श्रावणातला ऊन पावसाचा खेळ चालू असतो त्याचप्रमाणे मुसळधार पाऊसही आपले रौद्ररूप धारण करतो.
🌿 शरद ऋतू 🌿
याच ऋतूमध्ये पाऊस आपल्या परतीच्या प्रवासाला निघतो. आणि थंडीची चाहूल लागायला सुरूवात होते. मात्र, पाऊस गेल्यानंतरही जमिनीमध्ये काही प्रमाणात ओलावा असतो. त्यात सूर्यकिरणांमुळे जमीन तापते आणि या प्रक्रियेत उच्च तापमान आणि आर्द्रता वाढून आपल्याला कमालीची उष्णता सहन करावी लागते. यालाच आपण ऑक्टोबर हिट असंही म्हणतो. मराठी दिनदर्शिकेनुसार अश्विन-कार्तिक तर इंग्रजी महिन्यांनुसार सप्टेंबर -ऑक्टोबर या कालावधीत शरद ऋतू येतो.
🌿 हेमंत ऋतू 🌿
हा ऋतू नोव्हेंबर-डिसेंबर दरम्यान येतो. आणि मार्गशिष-पौष या मराठी महिन्यांमध्ये या ऋतूची सुरूवात होते. याच ऋतूमध्ये थंडीची चाहूल लागायला सुरूवात होते. या दिवसांत फारशी कडाक्याची थंडी नसली तरी वातावरण अतिशय प्रसन्न आणि ताजेतवाने असते. आणि म्हणुनच ही थंडी हवीहवीशी वाटते.
🌿 शिशिर ऋतू 🌿
हेमंत ऋतूमध्ये हवीहवीशी वाटणारी थंडी या ऋतूमध्ये मात्र शिगेला पोहोचते. सगळीकडे शेकोट्या पेटवल्या जातात. स्वेटर, कानटोपी यांची आवश्यकता लागतेच. सकाळच्या कोवळ्या सूर्यकिरणांची तर आपण आतुरतेने वाट पाहत असतो. असा हा शिशिर ऋतू जानेवारी-फेब्रुवारी व मराठी महिन्यांनुसार माघ-फाल्गुन दरम्यान येतो.
🤔 ऋतूंची निर्मिती कशी होते ?
पृथ्वीच्या फिरण्याच्या दोन गती आहेत एक परिवलन आणि दुसरी परिभ्रमण. परिवलन म्हणजे स्वतःभोवती फिरणे आणि परिभ्रमण म्हणजे स्वतःभोवती फिरता फिरता सूर्याभोवती फिरणे. पृथ्वीच्या परिभ्रमण गतीमुळे ऋतू निर्माण होतात. पृथ्वीचा अक्ष आणि पृथ्वीची सूर्याभोवतीची भ्रमणकक्षा यांच्यातील कोन हा काटकोनापासून '२३.५' अंशाने कललेला आहे. त्यामुळे पृथ्वीवर पडणारी सूर्याची किरणे ही काही प्रमाणात तिरपी पडतात. जसजशी पृथ्वी सूर्याभोवती फिरते तसतसे पृथ्वीवर पडणाऱ्या सूर्यकिरणांचा तिरपेपणा कमी जास्त होत राहतो आणि त्यामुळे पृथ्वीवरील तापमान बदलत राहते. या बदलांनाच आपण ऋतू असे म्हणतो.पृथ्वीच्या उत्तर गोलार्धावर आणि दक्षिण गोलार्धावरती परस्पर विरुद्ध ऋतू चालू असतात.
हवामानाशी निगडित काही महत्त्वाच्या संकल्पना :
ऑक्टोबर हिट :
मान्सून माघारीच्या काळात ज्याला आपण ‘परतीचा पाऊस’ असं म्हणतो त्यावेळी आकाश स्वच्छ होते व तापमान वृद्धी होते जमिनीत ओलसरपणा असतो. उच्च तापमान आणि आर्द्रता यामुळे हवामान असह्य होते यालाच ऑक्टोबर हिट असे म्हणतात.
आम्रवर्षा ( Mango shower ) :
उन्हाळा संपल्यानंतर मान्सून आगमनापूर्वी केरळ व कर्नाटकच्या किनारी भागात थोडेफार पर्जन्य होते. स्थानिक भागात या पावसाला आम्रवर्षा असे म्हणतात. कारण हा पाऊस आंबा लवकर पिकवण्यास सहाय्य करतो.
फुलांचे पर्जन्य ( Blossom shower ) :
या पर्जन्यामुळे केरळ व केरळ जवळच्या कॉफी उत्पादक क्षेत्रात कॉफीची फुले उमलण्यास सुरुवात होते.
लू ( Loo ) :
उत्तर मैदानी प्रदेशात पंजाब पासून बिहार पर्यंत हे वारे वाहतात. हे अतिशय पीडादायक वारे असतात. दिल्ली व पटनादरम्यान यांची तीव्रता अधिक असते.
निष्कर्ष
या लेखात आपण सहा ऋतूंची माहिती घेतली. तसेच त्यांची मराठी आणि इंग्रजी महिन्यांमध्ये केलेली विभागणी आणि हवामानाशी निगडीत संकल्पना पाहिल्या.